मि .डिपेंडेबल : अमोल पाटील



ऑगस्ट २०११ च्या रविवार ची एक संध्याकाळ . आमच्या शाळेत मी प्रथमच न्यू इंग्लिश स्कुल च्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे म्हणून एक बैठक आयोजित केली होती . वसई हे छोटेसे गाव असल्याने बरेच चेहरे तसे ओळखीचे होते . पण पहिल्याच डेस्क वर (..हो डेस्क वरच ..बेंच वर हा मावत नाही )  वर एक अनोळखी भारदस्त व्यक्तिमत्व बसले होते . अगदी साऊथ च्या फिल्ममध्ये हिरोंना असते तशी भरघोस मिशी ,थोडे कुरळे केस ,कोणे एके काळी कमावलेले शरीर थोडे पोटाकडून सुटलेले पण अजून घट्ट चण ..आणि तो ऐतिहासिक "RBK "लिहिलेला ड्राय फिट टी  शर्ट . ( ऐतिहासिक अशासाठी की पुढे किमान ४६७ दिवस मी जेव्हा जेव्हा याला भेटलो तेव्हा याने ९७.४ % वेळा हाच शर्ट घातलेला !..अशी आकडेवारी वगैरे दिली की जरा जास्त इफेक्ट येतो ना ब्लॉग पोस्ट ला ? :-)   ) ..ही माझी आणि अमोल ची पहिली भेट . अमोल आमच्या न्यू इंग्लिश स्कुल च्या १९८३ बॅच चा . म्हणजे उद्योगपती उज्जवल म्हात्रे , तेल सम्राट राजेश वसईकर ,टॉप बँकर महेश चाचा गोरक्ष अश्या एकाहून एक नररत्नां ची ही बॅच ..हे दहावी झाले तेव्हा सदर लेखक २२ महिने वयाचा होता ..म्हणजे हा किती सिनियर बघा !

पुढे अमोल,उज्जवल आणि १९८३ ग्रुप मध्ये आमचे जास्तीत जास्त "बसणे " ( अर्थात डायट कोक हातात घेऊन बरं  )  होत गेले आणि अमोल अधिकाधिक जवळ येत गेला .अमोल त्या वेळी आय बी एम मध्ये होता आणि मी सुद्धा जानेवारी २०१२ ला आय बी एम जॉईन केली ,त्यामुळे तो माझा फक्त शाळेमधील सुपर सिनियर न रहाता एक कार्यालयीन सहकारी सुद्धा झाला . आय बी एम मध्ये गोरेगाव ऑफिस मध्ये आम्ही खूप धमाल केली .त्या काळात गोरेगाव स्टेशन जवळील सत्कार मध्ये मासे खायला जाणे हा याचा  एक विशेष छन्द !  खाणे आणि खिलविणे याबाबत पाटील जरा जास्तच हळवे आहेत . मित्रांच्या पिकनिक आणि पार्टीमध्ये कोलंबी सोलण्यापासून ते चिकन किंव्वा बोंबील धुणे,कांदा कापणे आणि जेवण करणे या बाबी साहजिकच अमोल कडे आपसूक आऊट सोर्स केल्या जातात . बाकी जनता बाहेर आनंदाने " पेयपान" ( ! ) आणि गप्पा मारताना किचन मध्ये एक टी शर्ट आणि बॉक्सर शॉर्ट घालून गपचूप जेवण करणारा अमोल बऱ्याच वेळा खास मित्रांनी पहिला आहे . "अरे अमोल ..बस जरा आराम कर " असे कोणी म्हटले की ,हा "**** मी बसलो तर भो****** तुम्हाला गिळायला जेवण कसे मिळणार " अशी एक सिक्सर मारून परत किचन मध्ये गायब होणार .

अमोल चे दुसरे एक वैशिष्ट्य म्हणजे याला मी "मि .डिपेंडेबल" म्हणतो . IAS ऑफिसर असलेल्या डिस्ट्रिक कलेकटर कडे डिजिटल इंडिया चे प्रेझेन्टेशन असो ,आदित्य पाटील कडे अवघ्या ४ तासात अचानक ३५ लोकांची पार्टी अरेंज करणे असो की शाळेच्या स्पर्धांसाठी टी शर्ट्स बनविणे असो ,अमोल कडे जबाबदारी दिली की ते काम १०० % होणारच .  ( अर्थात शाळेच्या आणि मित्रांच्या पार्टी आयोजनाच्या च्या कामात नागरी  प्रदूषण नियंत्रण ( PUC ) क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व प्रशांत दादा पाटील यांची भक्कम साथ अमोल ला असतेच .  ) या माणसाला "हे मला येत नाही /जमणार नाही" असे म्हणताना आज पर्यंत मी ऐकले नाही ." काश्मीर प्रश्न सुटत नसेल तर शेवटचा उपाय म्हणून अमोल ला बोलवा..त्याला काहीही शक्य आहे  " असा ट्विट मोदींना सुगन्धा जोशी या करणार होत्या पण त्यांना ट्विटर वर मराठी फॉन्ट टाईप कसा करायचा हे वेळीच न जमल्याने  ते  राहूनच  गेलं असा एक किस्सा सुतार आळी मध्ये जुने जाणते लोक सांगतात . खरं खोटं ते सातमादेवीला ठाऊक ! पण या माणसाचे टॅलेंट अफाट आहे . आय बी एम मध्ये ज्या सहजतेने हा आय टी प्रोजेक्ट्स करायचा त्याच सहजतेने हा सीमा वहिनीच्या मेलांज स्टुडिओ मध्ये बसून महिला कस्टमर्स ना कपडे विकू शकतो . तो सुतार आळी च्या वार्षिक पूजेत  नाटकात भूमिका सुद्धा करू शकतो आणि शाळेमध्ये सोलर एनर्जीचा वापर कसा करता येईल याचा अभ्यास त्याच सहजतेने करू शकतो . सुतार आळी मध्ये मयत झाले तरी अंत्य संस्काराची सर्व "व्यवस्था" हा आणि महेश गोरक्ष करतात .जेनेरिक मेडिसिन्स साठी सरकारी योजना या विषयावर वर याचा जेव्हढा सखोल अभ्यास आहे तेव्हढाच अभ्यास मेडिकल डिव्हाइसेस च्या व्यापारावर आहे . हा मनुष्य क्रिकेट उत्तम खेळतो आणि बॅडमिंटन सुद्धा ! याच्या सुटलेल्या पोटाकडे पाहून याच्या फिटनेस चा अंदाज कराल तर नक्की फसाल . अर्जुना रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा यांनी अमोल कडून फिटनेस चे धडे गिरविले आहेत अशी पक्की खबर राजेश वसईकर ने एका शनिवारी एकदा रात्री ११ नन्तर मला दिली आणि दुसऱ्याच दिवशी "ह्या .. च्यायला वसईकर रात्री ११ नन्तर जे बोलतात ते नल अँड व्हॉइड असते .." असे म्हणून अमोल ने ती बातमी उडवून लावली . ( परत खरं खोटं सातमादेवी ला माहित ) 

न्यू इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी महासंघाचा हा एक भक्कम आधार  आहेच ,पण वसई मध्ये कुठलेही सामाजिक काम असो आणि याला हाक मारली की पट्ठ्या हजर ! फोन केला आणि ते परिचित "बोला गवाणकर " ऐकले की समजायचे आज काम होणार आपले ! समाजसेवा करतानाच आपल्या आय टी कक्षेतील अनुभवाचा वापर करून डिजिटल मार्केटिंग,वेब टेक्नॉलॉजीस वगैरे मध्ये सुद्धा याचे "स्टार्ट अपस " बरोबर काम सुरु असते . अमोल बाबत चित्रपट काढायचा झाला तर "तो सध्या काय काय काय आणि काय करतो " असे नाव द्यावे लागेल . 

अमोल चा हळवा कोपरा म्हणजे त्याचे कुटुंब . आणि आपल्या दोन मुलींवर तर याचा विशेष जीव . सलोनी आणि सोनल ने तोंड उघडायचा अवकाश की बाबाने त्यांची मनोकामना पूर्ण केलीच पाहिजे ! पोरींना वाढदिवसाला मुंबई च्या विशिष्ट् दुकानातूनच ड्रेस हवा म्हणून याने एक दिवस वसई-चर्चगेट-गोरेगाव-वसई असे अर्ध्या दिवसात २०० किलोमीटर एकट्याने ड्रायव्हिंग करून तोच ड्रेस आणून दिला ! ( सीमा वहिनी च्या मते बाबा पोरींचे जरा जास्तच लाड करतो. आणि पोरी बाबाला गोड बोलून गुंडाळतात :-)  ) . एकदा सलोनी अहमदाबाद वरून रात्र भर बस ने प्रवास करून सकाळी लवकर वसई च्या हायवे फाट्याला उतरणार होती आणि काही कारणाने तिच्या बस ला उशीर झाला . हायवे पासून घर अर्ध्या तासावर आणि बस चांगली किमान २-३ तास लेट . त्यामुळे घरी येऊन ,विश्रांती घेऊन अमोल परत हायवे ला सहज जाऊ शकला असता आणि आजच्या मोबाईल च्या युगात सम्पर्क साधून वेळा को ऑर्डिनेट करणे फार कठीण सुद्धा उरले नाहीये . पण चुकून ट्राफिक सुटलाच आणि पोरीची बस थोडी लवकर आली तर तिला पाच  मिनिटे सुद्धा एकटी उभी राहायला लागू नये म्हणून  "बाबा" चक्क ५ तास एकाच जागी गाडीत बसून राहिला ! बस आली खूप उशिरा पण बस मधून उतरलेल्या पोरीला बाबा लगेच भेटला आणि याची प्रतीक्षा फळाला आली . 

आदित्य वर ब्लॉग पोस्ट लिहिला आणि ३५ लोकांना लगेच एक पार्टी मिळाली.त्यामुळे "उत्साह" वाढून अमोल वर हा ब्लॉग लिहितोय.बघूया पाटील "घ्या भ****** पार्टी ,आपण केव्हा पण तयार " असे म्हणून पार्टी देतायत का आता :-)

चिन्मय गवाणकर 
वसई-- 

Comments

  1. सुंदर लिहीलस

    ReplyDelete
  2. Excellent Chinmay.
    Hats off to Amol

    ReplyDelete
  3. Good one... We knew all these attributes of Amol's personality, however reading thru your pen is delightful...

    ReplyDelete

Post a Comment